छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एका व्यसनाधीन पित्याने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा ३० वर्षांच्या नवरदेवाशी विवाह लावून दिला. यानंतर दामिनी पथकाने कारवाई करत सासरच्या तावडीतून मुलीची सुटका केली आहे.
धारेश्वर मंदिरात हा बालविवाह उरकला गेला, मात्र दामिनी पथकाने देवदूतासारखी धाव घेत या चिमुकलीची सासरच्या तावडीतून सुटका केली. वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या या निर्दयी कृत्याने शहर हादरले असून, पीडितेच्या एका शब्दाने उपस्थित पोलिसांचेही डोळे पाणावले आहेत. एकीकडे मुलींच्या शिक्षणासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना संभाजीनगर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील निर्मला निंभोरे (हेड कॉन्स्टेबल), सरिता कुंडारे, रानी केदार यांनी ही कारवाई केली. त्यांना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे एएसआय पवार, नितेश दुर्वे (बाल सुरक्षा अधिकारी) आणि पीटर मोबाईल पथकाने मोलाची साथ दिली.












